
परभणी, 25 मार्च (हिं.स.)। श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुरुवार 26 मार्च रोजी गंगाखेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती व समस्त हिंदू बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाच्या सोहळ्यानिमित्त 23 व 24 मार्च रोजी शहरातील सुमारे 20 विद्यालयांमध्ये पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते विजय खुटवड (श्री संत सेवा संघ, पुणे) यांचे ‘पुरुषोत्तम श्रीराम’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान पार पडले. 26 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत पुणे येथील ढोल पथक, पारंपरिक संबळ वादक, वारकरी भजनी मंडळ तसेच राम, लक्ष्मण व सीता यांचे सजीव देखावे सादर करण्यात येणार आहेत.
मिरवणुकीनंतर प्रभू श्रीरामाची आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. मिरवणुकीचा मार्ग गोदाकाठ येथून सुरू होऊन भगवती चौक, श्रीराम चौक, अहिल्याबाई होळकर चौक मार्गे शिवस्मारक येथे श्रीराम पूजनानंतर समारोप होणार आहे. या भव्य सोहळ्यास पंचक्रोशीतील माता-भगिनी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती, गंगाखेडतर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis