
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)सिटी बससेवेमध्ये महिलांसाठी विशेष बससेवा तसेच पर्यटकांसाठी संभाजीनगर दर्शन बससेवा सुरू करण्याचे आदेश महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी दिले.अनिल मकरिये यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेऊन स्मार्ट सिटीबस सेवेचा आढावा घेतला. बैठकीला उपायुक्त अपर्णा थेटे, सिटीबस विभागाचे मुख्य चालन अधिकारी संजय सुपेकर, मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय चामले व अन्य अधिकारी उपस्थित होते.
अनिल मकरिये यांनी सिटीबस सेवेची सविस्तर माहिती घेतली. महिलांसाठी विशेष बस सुरु करा, पर्यटकांसाठी संभाजीनगर दर्शन बस सुरु करा असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शहरात सिटीबसचे किती थांबे आहेत सिटीबस सेवेतून आतापर्यंत किती उत्पन्न मिळाले, उत्पन्नावर काही परिणाम झाला का त्यावर काय उपाययोजना करण्यात आल्या, बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर महिलाच बसतात का, निर्धारित वेळेत बस धावतात का, आदी मुद्यांची माहिती त्यांनी घेतली व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी होर्डिंग संदर्भातदेखील बैठक घेतली. शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. या फलकांच्या माध्यमातून विकास कामांच्या चित्रफिती दाखवण्यात येतात का याची विचारणा केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis