
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)। युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच अफवांचे पेव फुटले असताना गॅस सिलिंडरसाठी गोदामावर चकरा माराव्या लागत असल्याने सर्वसामान्य जनतेसह वृद्ध व महिलांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सध्या ऑनलाइन गॅस बुकिंग यंत्रणा बहुतांश वेळ बंद राहत असल्याने ग्राहकांना नोंदणीसाठी शहरातील गॅस एजन्सींकडे धाव घ्यावी लागते. तिथे नोंदणी झाली, तर सिलिंडर घेण्यासाठी शहरापासून तब्बल सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अंधानेर किंवा गराडा येथील गोदामावर जावे लागत आहे. या प्रवासासाठी रिक्षाचालक ३०० ते ४०० रुपये भाडे आकारत असल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.
गॅस नोंदणी शहरात करावी लागते आणि सिलिंडरसाठी ४-५ किमी लांब गोदामावर जावे लागते. वृद्ध आणि एकल महिलांना ही कसरत शक्य नाही. गोदामावर पिण्याच्या पाण्याची किंवा सावलीची कोणतीही व्यवस्था नाही. जेव्हा ग्राहकांकडून घरपोच सेवेचे पैसे वसूल केले जातात, तेव्हा त्यांना गोदामावर का बोलावले जाते? प्रशासनाने जनतेची ही पिळवणूक थांबवून पूर्वीप्रमाणेच घरपोच सिलिंडर द्यावे
विशेष म्हणजे, गॅस एजन्सीकडून घरपोच सेवेचे शुल्क आकारले जात असतानाहीग्राहकांना गोदामावर बोलावले जात आहे. ज्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे, त्यांना पूर्वीप्रमाणेच घरपोच सिलिंडर का दिले जात नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शहरातील नागरिकांना घरपोच सिलिंडर मिळावे, या मागणीसाठी पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या अध्यक्षा सूर्यकांता गाडे आणि खरेदी-विक्री संघाचे संचालक आकाश बोलधने यांनी तहसीलदार सारिका भगत यांना निवेदन दिले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis