
परभणी, 25 मार्च (हिं.स.)। देशाला क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) करण्याच्या उद्देशान राबविण्यात येत असलेल्या 100 दिवसीय टीबी मुक्त भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परभणी जिल्ह्यात या अभियानांतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून अभियानाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
या अभियानातंर्गत परभणी जिल्हयातील अतिजोखीमग्रस्त अशा 212 गावांची निवड करण्यात आली असून या गावातील 14 वर्षांवरील सर्वजणांची क्षयरोग संबधी स्क्रिनींग करुन क्षयरुग्ण शोधणे व त्यांना उपचार उपलब्ध करुन देणे, असे उदिदष्ट ठरविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज सदर अभियानाबाबत आढावा बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर पोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद केंद्रेकर यांच्यासह शासकीय वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मनपाचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
टीबी मुक्त भारत अभियान-2 चा शुभारंभ राष्रीकीयस्तरावर दि. 24 मार्च रोजी क्षयरोग दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात संशयित टीबी रुग्णांचा शोध घेण्यासाठी घराघरात भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे. तसेच निदान झालेल्या रुग्णांना शासकीय स्तरावर मोफत उपचार व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
टीबी हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून योग्य वेळी निदान व नियमित उपचार घेतल्यास रोगावर मात करता येते. त्यामुळे कोणतीही लक्षणे आढळल्यास तपासणी करून उपचार पूर्ण करावेत आणि टीबी मुक्त भारत अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पोले यांनी केले.
अभियानाचा उद्देश - अति जोखमीच्या गटातील व्यक्तीमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती राबवून क्षयरोग रुग्ण शोधणे, क्षय रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करणे, टीपीटीचा प्रभावी वापर करून नवीन क्षय रुग्णाचे प्रमाण कमी करणे, जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटका पर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, जिल्हयातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानातंर्गत निक्षयमित्र यांच्याकडुन पोषण आहार कीटचे वाटप करणे.
अति जोखमीचे गट पुढील प्रमाणे - साठ वर्षावरील व्यक्ती, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती, धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, यापूर्वी क्षयरोगाचा उपचार घेतलेल्या व्यक्ती, क्षय रुग्णांच्या संपर्कातील घरातल्या व्यक्ती. एचआयव्ही बाधित व्यक्ती, तुरुंगातील कैदी, निवासी शाळा, औद्यो गिक वसाहती, कारखाने, वृद्धाश्रम इत्यादी.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis