
अमरावती, २५ मार्च (हिं.स.)। वरूड तालुक्यातील वधाळ ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळांचा पट वाढविण्यासाठी एक आगळावेगळा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीत असा ठराव मंजूर करण्यात आला की, ज्या पालकांनी आपल्या मुलांचा इयत्ता पहिलीत जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला, त्यांना चालू शैक्षणिक वर्षातील घरकर आणि पाणीपट्टी माफ करण्यात येईल.
ग्रामीण भागात खासगी आणि कॉन्व्हेंट शाळांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक पालक आपल्या मुलांना शहरांकडे पाठवत आहेत. यामुळे गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटत असून काही शाळा ओस पडण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती ओळखून वधाळ ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सरपंच सागर हरले यांनी सांगितले की, “गावातच दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण शाळांचे अस्तित्व टिकून राहावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.” या योजनेमुळे पालकांना आर्थिक दिलासा मिळणार असून शाळांमध्ये प्रवेशसंख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या ठरावाचे उपसरपंच नितीन आंजीकर, सदस्य पंकज कावनपुरे, वैशाली शेंगोळे, शबनम वसीम, जया रामकृष्ण राऊत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू कोहळे, उपाध्यक्षा अर्चना हरले आणि इतर सदस्यांनी स्वागत केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश विंचूरकर यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये आता आधुनिक सुविधा, विविध शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे पालकांनी गावातील शाळांवर विश्वास ठेवून मुलांचा प्रवेश घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, या उपक्रमाचे संगीता पोहणे, दिव्या सिलुकर, शबाना अली यांसह अनेक ग्रामस्थांनी कौतुक केले असून, या निर्णयामुळे ग्रामीण शिक्षणव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी