
नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। प्रमुख जिल्हा न्यायाधीश नरेंद्र ब्रह्मे यांनी कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी न्यायालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. तसेच न्यायालयीन कामकाज, सुविधा व प्रस्तावित इमारतीबाबत सविस्तर चर्चा केली.
कंधारचे जिल्हा न्यायाधीश-१ एन. एम. पाटील अध्यक्षस्थानी तर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. बी. के. पांचाळ यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश ब्रह्मे यांनी कंधार येथे न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी सर्वतोपरी सहकार्य
करण्याचे आश्वासन दिले. तसेच न्यायालयातील प्रलंबित व जुनी प्रकरणे प्राधान्यक्रमाने निकाली काढावीत व लोकन्यायालयात मध्यस्थीने प्रकरणे सोडविण्याला प्राथमिकता द्यावी, असे आवाहन न्यायाधीश व वकिलांना केले.
अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. पांचाळ यांच्या वतीने प्रमुख जिल्हा न्यायाधीश ब्रह्मे यांचा सत्कार केला. यावेळी अॅड. डी. जी. कुट्टे, अॅड. एन. डी. कोळनूरकर, अॅड. व्ही. व्ही. अलाबदे, अॅड. दिगंबर गायकवाड आदींसह अभिवक्ता संघाचे सदस्य, उपस्थित होते.
------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis