
जळगाव,, 25 मार्च (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तृतीयपंथीय व्यक्तींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘बीज भांडवल योजना’ राबविण्यात येत असून, जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी केले आहे. शासन निर्णय दि. १३ मार्च २०२६ नुसार या योजनेअंतर्गत तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगार व व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत देण्यात योणार असून यामुळे त्यांच्या स्वावलंबनाला चालना मिळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यास मदत होणार आहे. या योजनेत २५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असून, ४५ टक्के शासन अनुदान, ५० टक्के बँक कर्ज आणि ५ टक्के लाभार्थी हिस्सा असा निधीचा समावेश आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजामध्ये ३० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेसाठी कोणत्याही जामीनदाराची किंवा तारणाची आवश्यकता नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असावे व तो/ती महाराष्ट्र राज्याचा किमान १० वर्षांचा रहिवासी असावा. तसेच सक्षम प्राधिकरणाने दिलेले तृतीयपंथीय ओळखपत्र आवश्यक आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर