मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीसारख्या घटना टाळण्यासाठी नियोजन - दादाजी भुसे
मुंबई, 25 मार्च (हिं.स.)। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीच्या घटनेनंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस नियोजन सुरू आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीसारख्या घटना टाळण्यासाठी नियोजन - दादाजी भुसे


मुंबई, 25 मार्च (हिं.स.)। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीच्या घटनेनंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस नियोजन सुरू आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

नियम २९३ अंतर्गत उपस्थित झालेल्या प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे बोलत होते.

मंत्री दादाजी भुसे म्हणाले, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्वलनशील प्रोपिलीन वायू वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात होऊन गॅस गळती झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक वळवावी लागली. मुंबईकडे जाणारी वाहतूक राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे वळवण्यात आली होती. या काळात प्रवाशांना माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमे, एफएम रेडिओ आणि इतर यंत्रणांचा वापर करण्यात आला. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना पाणी व बिस्कीट वाटप करण्यात आले तसेच टोल नाक्यांवर विनामूल्य प्रवेश-निर्गमन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत सी. पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून, त्यांच्या अहवालानुसार भविष्यातील उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम ९७.७ टक्के पूर्ण झाले असून मे २०२६ पासून हा प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात वाहतूक कोंडी व अपघातांमध्ये मोठी घट होणार असल्याचा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande