आंध्रप्रदेश : भीषण अपघातात 14 जणांचा होरपळून मृत्यू
खासगी ट्रॅव्हल्स आणि टिप्परच्या धडकेनंतर लागली आग अमरावती, 26 मार्च (हिं.स.) : आंध्रप्रदेशच्या मार्कापुरमजवळील रायवरम परिसरात एका खासगी ट्रॅव्हल बस आणि टिपर लॉरी यांच्यात आज, गुरुवारी भीषण अपघात झाला. या अपघातात किमान 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला
आंध्रप्रदेशात अपघातानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतला


खासगी ट्रॅव्हल्स आणि टिप्परच्या धडकेनंतर लागली आग

अमरावती, 26 मार्च (हिं.स.) : आंध्रप्रदेशच्या मार्कापुरमजवळील रायवरम परिसरात एका खासगी ट्रॅव्हल बस आणि टिपर लॉरी यांच्यात आज, गुरुवारी भीषण अपघात झाला. या अपघातात किमान 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत.

यासंदर्भातील माहितीनुसार, वेगात असलेल्या बसने गिट्टीची वाहतूक करणाऱ्या टिप्परला धडक दिल्यानंतर बसला भीषण आग लागली. आग इतकी तीव्र होती की बस पूर्णपणे जळून भस्मसात झाली आणि अनेक प्रवासी आत अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. बचाव पथकाने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बस तेलंगणातील जगतियाल येथून प्रकाशम जिल्ह्यातील पोडिली येथे जात होती. मार्कापुरमचे डीएसपी नागराजू यांनी सांगितले की, अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून काही मृतदेह अद्याप बसमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. बचाव पथक मृतांची ओळख पटवण्याचे आणि त्यांच्या नातेवाईकांची माहिती गोळा करण्याचे काम करत आहे. ओळख पटताच संबंधित कुटुंबियांना कळवण्यात येणार आहे.दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande