
छिंदवाडा, 26 मार्च (हिं.स.) : मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्यातील मोहखेड़ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी संध्याकाळी एक भीषण रस्ते अपघात घडला. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या ‘हितग्राही संमेलन’वरून परतणाऱ्या बसची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते आणि सर्वजण हितग्राही संमेलनावरून परतत होते. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या संमेलनात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर बस उमरानाला दिशेने परतत असताना हा अपघात घडला.
सेमरिया हनुमान मंदिराजवळ संध्याकाळी सुमारे ६:३० वाजण्याच्या सुमारास उमरानाला परिसरात हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की बसचा ताबा सुटून ती उलटली. अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघात अत्यंत भीषण होता. एका प्रवाशाचा हात तुटून वेगळा झाला, तर अनेकांच्या डोक्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत.घटनेची माहिती मिळताच २० पेक्षा अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातामुळे रस्त्यावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस व प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. छिंदवाडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांमध्ये ६ पुरुष, ३ महिला आणि १ लहान मुलाचा समावेश आहे. प्रशासन आणि डॉक्टरांची टीम जखमींवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहे. पोलीस अधीक्षक अजय पांडे यांनी सांगितले की सर्व जखमींना उत्तम उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेन आणि स्थानिक नागरिकांची मदत घेण्यात आली. जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे, जेणेकरून जखमींना त्वरित उपचार मिळू शकतील.--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी