
नवी दिल्ली, 26 मार्च (हिं.स.) - मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी नायरा एनर्जीने आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. यात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपये, तर डिझेलमध्ये प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच, कंपनीने आपली गुजरातमधील 'वाडीनार' रिफायनरी ३५ दिवसांसाठी अंशतः बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
नायरा एनर्जी रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करते, मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे वाहतूक खर्च आणि विम्याच्या हप्त्यांमध्ये वाढ झाली आहे, ज्याचा परिणाम दरांवर झाला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेल्याने नायरा एनर्जीने इंधन दरात वाढ केली आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या IOC, BPCL, HPCL तुलनेत नायराचे दर आता काही प्रमाणात जास्त असणार आहेत.
नायरा एनर्जीने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वाडीनार येथील रिफायनरीच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी ३५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे काम मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या काळात रिफायनरीचे कामकाज पूर्णपणे किंवा अंशतः बंद राहील. रिफायनरी बंद असली तरी, कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणि पेट्रोल पंपांसाठी इंधनाचा पुरेसा साठा करून ठेवला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शटडाउन काळात पुरवठ्यात कोणतीही मोठी अडचण येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
दुसरीकडे, सरकारी तेल कंपन्या जसे की इंडियन आॅईल काॅर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांनी अजूनही सामान्य पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मात्र प्रीमियम पेट्रोलच्या दरात 2 ते 2.35 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी