ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
कोल्हापूर, २६ मार्च (हिं.स.) : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांची ओळख होती.
डॉ. जयसिंगराव पवार


कोल्हापूर, २६ मार्च (हिं.स.) : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांची ओळख होती.

गेल्या काही दिवसांपासून डॉ. पवार यांची प्रकृती अस्वस्थ होती. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे जवळपास दीड महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. दरम्यान गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठेशाहीचा इतिहासकार हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसरला झाला. डॉ. जयसिंगराव पवारांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एमए आणि पीएचडी पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी महाविद्यालयात अध्यापन केले. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. एमएपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची २० क्रमिक पुस्तकं अभ्यासक्रमात होती. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगरावांनी १९६४ मध्ये संशोधन कारकिर्दीला सुरुवात केली.

जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ यासारखे २५ हून अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले.

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणि धोरणे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. पवार आयुष्यभर झटत होते. इतिहासाचा भाग असलेल्या करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या चरित्र लेखनातून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली. राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्राला न्याय देण्याचं काम त्यांनी कृतज्ञतेपोटी केले. दादोजी कोंडदेव यांच्याविषयी महत्त्वाची मांडणीही डॉ. पवारांनी केली. पंचगंगा तिरी हे डॉ. जयसिंगराव पवार यांचं आत्मचरित्र विशेष गाजले.

जयसिंगराव पवार यांची प्रकाशित पुस्तकं

महाराणी ताराबाई

क्रांतिसिंह नाना पाटील

सेनापती संताजी घोरपडे

संभाजी स्मारक ग्रंथ

मराठेशाहीचा मागोवा

मराठी साम्राज्याचा उदयास्त

शिवचरित्र- एक मागोवा

शिवचरित्रापासून काय शिकावे?

आमच्या इतिहासाचा शोध व बोध

निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे 45हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक - सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी 1992 मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे 1200 पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ 2001 मध्ये प्रसिद्ध केला. भारतातील 16 भाषांमध्ये तसेच रशियन, फ्रेंच, इटालियन, जपानी या परकीय भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे. यांपैकी कन्नड, कोकणी, इंग्लिश, जर्मन, उर्दू व तेलुगू, आणि हिंदी भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. गुजराती व रशियन भाषेतील ग्रंथ प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या संस्थेचे संचालक आहेत.

मराठा इतिहास साहित्यासाठी अमूल्य योगदान

महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास इत्यादी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्लिश) या ग्रंथाचे प्रकाशन करून शाहूचरित्रकार म्हणून पुणे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. पवार यांनी ऐतिहासिक, तसेच इतर अनेक विषयांवरील २५पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. त्यांना इतिहासविषयक संशोधनातील आणि सामाजिक कार्याबद्दल अनेक व्यक्ती व संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande