मंत्री झिरवाळ यांचा तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ
मुंबई, 26 मार्च (हिं.स.) - राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा अश्लील व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय न
मंत्री नरहरी झिरवाळ


मुंबई, 26 मार्च (हिं.स.) - राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा अश्लील व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील असून काँग्रेसने झिरवाळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. त्या दरम्यान एका कथित अश्लील व्हिडिओमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासारख्या दिसणार्‍या व्यक्तीचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत मंत्री झिरवळ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती एका खोलीत बिछान्यावर पडलेली दिसते. तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत व्हिडिओमध्ये दिसतं आहे. यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ सात महिन्यापूर्वीचा आहे. शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती मंत्री झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर असून शेजारी खाद्य आणि मद्य आहे.

दोनच महिन्यापूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. तेव्हाच झिरवाळ यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती.

या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची झिरवाळ यांना कल्पना होती. मंगळवारी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षांमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. मंत्री पदासाठी काही इच्छुक असून त्यामधून झिरवाळ यांना लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांना मिळायला हवे, अशी मागणी करणारे झिरवाळ हे राष्ट्रवादीचे पहिले नेते होते. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करण्याचे अजित पवार यांनी ठरवले होते, असेही झिरवाळ यांनी जाहीर सांगितले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर झिरवाळ चर्चेत आले असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रीपद सोडावे लागणारे झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री ठरतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande