
जळगाव, 28 मार्च (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृहात आयोजित विशेष समारंभात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार आणि राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्या मार्फत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे सात सर्वसमावेशक निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी १८८ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
या यशामागील मुख्य कारण म्हणजे प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख बनविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. यामध्ये संकेतस्थळाचे आधुनिकीकरण, ‘आपले सरकार’ पोर्टलची अंमलबजावणी, ई-ऑफिस प्रणालीचा शंभर टक्के वापर, डिजिटल डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ jalgaon.gov.in नागरिकाभिमुख स्वरूपात मोबाईलसह सर्व उपकरणांवर सुसंगत केले गेले आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवर १९ अधिसूचित सेवा पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध असून अर्ज स्वीकृतीपासून सेवा वितरणापर्यंत प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केली जात आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सेतूदूत जळगाव’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवेमुळे २४x७ अर्ज स्थिती, तक्रार नोंदणी आणि विविध योजनांची माहिती मिळते. तसेच जिल्हा स्तरावरील डिजिटल डॅशबोर्ड मुख्यमंत्री डॅशबोर्डशी एकात्मिक आहे, ज्यामुळे योजना व कार्यक्रमांची रिअल-टाइम माहिती उपलब्ध होते.
नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत AI आधारित प्रणालीद्वारे शासकीय गोदामातील धान्य साठ्याचे रिअल-टाइम निरीक्षण व स्वयंचलित मोजणी केली जाते. GIS तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य, शिक्षण, जलस्रोत व पायाभूत सुविधांचा स्थानिक डेटाबेस तयार केला असून नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन अधिक अचूक झाले आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या यशाचे श्रेय जळगाव जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांच्या संगठित प्रयत्नांना दिले असून ते संपूर्ण जळगावकर नागरिकांना समर्पित असल्याचे सांगितले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर