
चंद्रपूर, 29 मार्च (हिं.स.)। जागतिक हवामान संघटनेनुसार सलग पाच दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस दररोज कमाल तापमान, सरासरी कमाल तापमानापेक्षा 5 अंश सेल्सीअसने जास्त असते, तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात. मैदानी भागात तापमान किमान 40 अंश किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर उष्णतेची लाट मानली जाते. दरम्यान उष्माघात नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने प्रभावी उपाययेाजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले आहेत.
उष्णतेच्या लाटेसंबंधी आजाराची लक्षणे : 1) चक्कर येऊन पडणे, 2) फेफरे किंवा झटके येणे, 3) झोपेतून उठण्यास त्रास होणे / उठता न येणे, 4) गोंधळल्यासारखे बोलणे / वागणे, 5) श्वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, 6) शरीराचे तापमान 105 अंश फॅरनहिट (40.5 अंश सेल्सिअस) पेक्षा अधिक होणे, 7) स्नायुत पेटके येणे, 8) चिडचीड होणे, 9) डोकेदुखी, अशक्तपणा येणे, 10) मळमळ व उलटी होणे, अधिक घाम येणे.
काय करावे : 1) शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे, 2) डोक्यावर टोपी, रुमाल, टॉवेल किंवा छत्री वापरावी, 3) उन्हात बाहेर जातांना डोळ्यावर गॉगल्स लावावा, 4) कष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी कमी तापमानात करावी.
काय करू नये : 1) दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर उन्हात जाणे टाळावे, 2) उन्हात अतिकष्टाची कामे करू नये, 3) दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये, 4) गडद घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे, 5) उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खावू नये.
येथे करा संपर्क : उष्माघाताबाबत संपर्क करावयाचा असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर कॉल सेंटर दूरध्वनी क्रमांक 07172 – 250400
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव