
चंद्रपूर, 29 मार्च (हिं.स.)। गत पंधरवड्यापासून जिल्ह्यात दैनंदिन तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम थेट मानवी शरीरावर होत असून योग्य काळजी घेतली नाही तर उन्हाच्या तिव्रतेमुळे कधीकधी मृत्युही होऊ शकतो. त्यामुळे उष्माघात नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने प्रभावी उपाययेाजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. नागरिकांनी सुध्दा उन्हापासून संरक्षणासाठी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात नियंत्रण कृती आराखडाबाबत आयोजित बैठकीत डॉ. वुईके बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे आदी उपस्थित होते.
उष्माघाताबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, उष्माघाताची लक्षणे, घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करू नये आदी बाबी नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. उष्माघाताबाबत संपर्क करायचा असल्यास जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक व उष्माघात संपर्क अधिका-यांची यादीसुध्दा नागरिकांपर्यंत पोहचवा. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांसाठी राखीव खाटा, रेफरलसाठी रुग्णवाहिकेची उपलब्धता, कुलरसह थंड खोलीची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओआरएस व औषधीसाठा उपलब्ध ठेवावा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव