
रायगड, 29 मार्च, (हिं.स.)। नेरळ ग्रामपंचायत मधील घरगुती कचराकुंड्यांच्या गोंधळप्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली असून दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या सुमारे ४ हजार कचराकुंड्या अखेर गोडाऊनमध्ये सापडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या निधीतून घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणावर घरगुती कचराकुंड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचल्या नसल्याने गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात होता. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
दरम्यान, स्थानिक पातळीवर काही नागरिक आणि भगवान चंचे व मोरे तसेच ग्रामसेवक अरुण कार्लेकर यांनी या सर्व कुंड्या एका गोडाऊनमध्ये साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर संबंधित गोडाऊन उघडण्यात आले असता मोठ्या प्रमाणावर घरगुती कचराकुंड्या साठवलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या घडामोडींमुळे प्रकरणावरचा पडदा अखेर उघडला आहे.
सदर कचराकुंड्या आता टप्प्याटप्प्याने नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या संपूर्ण खरेदी आणि साठवण प्रक्रियेत झालेल्या त्रुटी, जबाबदाऱ्या आणि संभाव्य गैरव्यवहार याची चौकशी व त्यांच्यावर घुन्हे नोंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)