
छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.) वाढत्या वाहतूक कोंडीचे कारण पुढे करीत महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून सुरू असलेले आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयास भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी कडाडून विरोध करीत स्वतःच्या पक्षाचे महापौर, सभापती यांना घरचा आहेर दिला आहे. आ. केणेकरांच्या आमदारकीची मुदत संपत असताना त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात दंड थोपटले आहेत. निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरण्याची धमकी दिली आहे. बेरोजगारांना गुन्हेगारीकडे वळवणारा हा निर्णय आहे.
महापालिका प्रशासन आणि आ. संजय केणेकर यांच्यात नेहमीच वादाच्या ठिणग्या उडत आलेल्या आहेत.
भाजपमध्ये अंतर्गत राजकारण तापलेले आहे. पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत घेतलेल्या पहिल्याच निर्णयास अपशकुन झाला आहे. स्वकीयांच्या विरोधात भूमिका घेणारे आ. केणेकर यांनी आपला सवतासुभा राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला विरोध दाखवून त्यांनी ते अधोरेखित केले.
शहरातील हजारो नागरिकांना रोजगार आणि सुविधा ठरलेले आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाविरोधात भाजपच्या आमदाराने उघड दंडथोपटले आहेत. मनपा आयुक्त आणि प्रशासनाला कात्रीत पकडण्याची संधी सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका प्रशासनाने कुठलेच झोन अद्याप निर्माण केले नाहीत. विक्रेत्यांसाठी झोन निर्माण केले नाहीत. हातगाडीचे धोरण ठरवले नाही. अनेक जण रस्त्यावर दुकाने थाटून उपजीविका भागवत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis