विश्व क्षयरोग दिनानिमित्त परभणी मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची जनजागृती
परभणी, 28 मार्च, (हिं.स.)। विश्व क्षयरोग दिवस निमित्त परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पेडगाव येथे क्षयरोग (टीबी) प्रतिबंध व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यंदाच्या “होय! आपण टीबी संपवू शकतो!” या जागतिक थीमनुसार विद्यार्थ
विश्व क्षयरोग दिनानिमित्त परभणी मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची जनजागृती


परभणी, 28 मार्च, (हिं.स.)। विश्व क्षयरोग दिवस निमित्त परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पेडगाव येथे क्षयरोग (टीबी) प्रतिबंध व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यंदाच्या “होय! आपण टीबी संपवू शकतो!” या जागतिक थीमनुसार विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

एमबीबीएस तृतीय वर्षातील निखिल चव्हाण, ओंकार गरुड, अजिंक्य उक्कलकर, सोमेश घाटकर, प्रांजली धोत्रे आणि आदित्य बोराडे या विद्यार्थ्यांनी क्षयरोग विषयावर माहितीपूर्ण पोस्टर व मॉडेल्स सादर केले. त्यांनी आजाराची कारणे, लक्षणे, उपचार पद्धती तसेच प्रतिबंधात्मक उपाय याबाबत उपस्थित नागरिक व रुग्णांमध्ये प्रभावी जनजागृती केली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लिनिकल पोस्टिंगमधील अनुभवही मांडले. यामुळे क्षयरोगाचे निदान, रुग्णसेवा आणि उपचार प्रक्रियेबाबत उपस्थितांना उपयुक्त माहिती मिळाली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाला डॉ. किरण सागर (विभागप्रमुख, मायक्रोबायोलॉजी), डॉ. रविराज वाळवंटे (विभागप्रमुख, ॲनाटॉमी), डॉ. इम्रान सय्यद (सहाय्यक प्राध्यापक, ॲनाटॉमी), डॉ. शेळके (सहाय्यक प्राध्यापक, पॅथॉलॉजी) तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. गुणवंत आहिरे उपस्थित होते. डॉ. किरण सागर आणि गुणवंत आहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्षयरोग निर्मूलनासाठी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप “क्षयरोग मुक्त भारत – क्षयरोग मुक्त समाज” या संकल्पनेने करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे परभणी जिल्ह्यात क्षयरोगाविषयी जनजागृतीला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande