
छत्रपती संभाजीनगर, २८ मार्च (हिं.स.) : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पूर्वीइतकाच, किंबहुना अधिक प्रमाणात उपलब्ध असतानाही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तातडीची बैठक घेऊन वितरण सुरळीत करण्याचे निर्देश दिले.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांनी पेट्रोलपंप चालक व पेट्रोलियम वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावली.
या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, लेखाधिकारी पी.पी. होळकर, सहायक पुरवठा अधिकारी संदीप शिंदे तसेच भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय पेट्रोलपंप चालक संघटनेचे पदाधिकारीही बैठकीत सहभागी झाले.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले की, इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही रांगा लागत असतील, तर त्यामागील कारणे तातडीने दूर करणे आवश्यक आहे. वितरक कंपन्या आणि पेट्रोलपंप चालकांनी समन्वय साधून वितरण सुरळीत करावे, असे त्यांनी निर्देशित केले.
अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा आणि अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, प्रशासनाने दुचाकींसाठी २०० रुपये आणि चारचाकींसाठी २००० रुपयांची इंधन मर्यादा लागू केली होती, ती आता हटवण्यात आली आहे. इंधन वितरणावर कोणताही निर्बंध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय, ग्रामीण भागात शेतीसाठी लागणाऱ्या डिझेलची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis