

रायगड, 28 मार्च, (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवपुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगड किल्ला येथे दि. १ व २ एप्रिल २०२६ रोजी अभिवादन कार्यक्रम व दुर्गसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
यंदाचे हे ३४६ वे शिवपुण्यतिथी वर्ष असून, १९२५-२६ मध्ये झालेल्या शिवछत्रपतींच्या समाधी जिर्णोद्धाराचे शताब्दी वर्षही याच निमित्ताने साजरे होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यसभेचे खासदार व भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘श्रीशिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक आनंद पाळंदे यांना जाहीर करण्यात आला असून, या पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष आहे. याशिवाय हिंदवी स्वराज्याचे सरदार नागपूरकर भोसले यांचे वंशज मुधोजीराजे भोसले तसेच निवृत्त ब्रिगेडियर संग्राम मोहिते यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. शाहिरी कार्यक्रमासाठी शाहीर विक्रम अवचिते यांची उपस्थिती लाभणार आहे.
शिवपुण्यतिथीच्या आदल्या दिवशी श्री शिवशंभू विचार मंच यांच्या वतीने दुर्गसंवर्धन परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत प्रा. प्र. के. घाणेकर, डॉ. सचिन जोशी तसेच महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग चे संचालक डॉ. तेजस गर्गे यांची व्याख्याने व सादरीकरणे होणार आहेत. याचबरोबर सन्मानित मान्यवरांच्या मुलाखती गडावरील ‘राजसभा’ येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी न्याहारी, भोजन, निवास आणि स्वच्छतेची चोख व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात आली असून, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे व कार्यवाह सुधीर थोरात यांनी दिली. दरम्यान, मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी सर्व शिवप्रेमींना मोठ्या संख्येने रायगडावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)