कृष्णाचा अवतार असल्याचे भासवत खरातने नेवाशाच्या व्यापाऱ्याला घातला अडीच लाखांचा गंडा
Kharat, pretending to be an incarnation of Krishna, duped a businessman from Naivasha of Rs. 2.5 lakhs
कृष्णाचा अवतार असल्याचे भासवत खरातने नेवाशाच्या व्यापाऱ्याला घातला अडीच लाखांचा गंडा


नाशिक, 28 मार्च (हिं.स.)।

व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणींचे निवारण होऊन प्रगती व्हावी, याकरीता ज्योतिषी अशोक खरात याने कृष्णाचा अवतार असल्याचे सांगून नेवाशाच्या व्यापाऱ्याकडे अडीच लाख रुपये व सोन्याच्या अंगठ्या काढून घेत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी राजेंद्र नानासाहेब भागवत (रा. गाडेनगर, नेवासा फाटा, जि. अहिल्यानगर) हे कापड दुकानदार आहेत. त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसल्याने भागवत यांचे काका ज्ञानदेव तगरे यांनी नाशिकमध्ये त्यांच्या ओळखीच्या असलेल्या कॅप्टन अशोक खरात हे ज्योतिषी असून, त यांच्याकडे जाऊन सल्ला घेण्याचे सांगितले. त्यानुसार डिसेंबर २०२२ मध्ये फिर्यादी हे पत्नी जयश्री भागवत व काका असे सर्व जण खरातच्या ओकस लॅण्ड डेव्हलर्सच्या कार्यालयात गेले. खरात याची भेट घेतल्यानंतर त्यांनी भागवत यांच्या अडचणी समजावून घेतल्या. मी कृष्णाचा अवतार आहे, तुम्हाला मंत्राने भारुन पुष्कराज व हिरा देतो, अंगठ्या देतो, तुम्ही सोन्याच्या अंगठीमध्ये दिलेला पुष्कराज रत्न व हिरा परिधान करा, त्यामुळे तुम्हाला दिव्य शक्ती प्राप्त होऊन व्यवसायात अनेक पटीने वृद्धी होईल, त्यासाठी सोन्याच्या अंगठ्या लागतील. त्यामध्ये मी पुष्कराज खडा टाकून दिल्यावर तो तुम्ही गुरुवारी परिधान करा. अंगठ्या तयार झाल्यावर तुम्हाला फोन करून सांगू तेव्हा तुम्ही या अंगठ्या घेऊन जा, एका पुष्कराज खड्याची किंमत ७५ हजार रुपये आहे. तुमच्याकडे आता सोन्याच्या अंगठ्या असतील तर द्या, असे फिर्यादी भागवत यांना सांगितले. त्यानुसार भागवत यांनी सोन्याच्या दोन अंगठ्या व त्यांच्या पत्नीची १ अंगठी अशा तीन सोन्याच्या अंगठ्या व पुष्कराज खड्याची आगाऊ रक्कम म्हणून १ लाख रुपये अशोक खरात याच्याकडे दिले.

४-५ दिवसांनंतर खरात याच्या कार्यालयातून ऑफिस बॉयने फोन करुन अंगठ्या घेऊन जा असे सांगितले. त्यानुसार भागवत हे अंगठ्या घेण्यासाठी आले. त्यांनी उर्वरीत १ लाख ६२ हजार रुपये देऊ केले असता खरात याने ही रक्कम चेक स्वरुपात स्वीकारण्यास नकार देऊन रोख रक्कम मागितली. तेव्हा फिर्यादीने त्याच्याकडील १ लाख रुपये व त्यांच्यासोबत असलेला मित्र सचिन राठोड यांच्याकडून ६२ हजार रुपये घेऊन अशोक खरात याला पुन्हा १ लाख ६२ हजार रुपये रोख स्वरुपात दिले. या अंगठ्या घेऊन फिर्यादी घरी आले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अंगठ्या बोटात घालूनही व्यवसायात कोणताही फरक पडला नाही, त्यादरम्यान वर्तमानपत्रांमध्ये खरातबाबत गुन्हा दाखल झाल्याचे समजल्याने फिर्यादी यांनी हातातील अंगठ्या व खडे चेक केले असता खरातने दिलेले खडेव हिऱ्याची किंमत फक्त ५ हजार रुपये असल्याचे व त्या तांब्याच्या धातूमध्ये तयार केल्याचे समजले. त्यानुसार भोंदू अशोक खरात याने फिर्यादी भागवत यांची वीस ग्रॅम सोन्याच्या अंगठ्यांचा अपहार करून २ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande