आटपाडी (जि. सांगली) प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल
* आरोपीवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासनाला दिल्या सूचना मुंबई, २८ मार्च (हिं.स.) : आटपाडी तालुक्यातील (जि. सांगली) बनपुरी (यमगर वस्ती) येथे चोरीच्या संशयावरून वडिलांनी दोन अल्पवयीन मुलींना उलटे टांगून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


* आरोपीवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासनाला दिल्या सूचना

मुंबई, २८ मार्च (हिं.स.) : आटपाडी तालुक्यातील (जि. सांगली) बनपुरी (यमगर वस्ती) येथे चोरीच्या संशयावरून वडिलांनी दोन अल्पवयीन मुलींना उलटे टांगून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या क्रूर कृत्यात ऋतुजा यमगर (९) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची बहीण अनुजा (११) गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. या प्रकरणी आरोपी दादू हैबत (नाना) यमगर याला आटपाडी पोलिसांनी अटक केली असून, गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, डॉ. गोऱ्हे यांनी, सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आटपाडी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्याशी दूरध्वनीवरून प्रकरणाची सद्य परिस्थिती समजून घेऊन त्यांना पुढील योग्य त्या कारवाईबाबत सूचना दिल्या.

तसेच त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जखमी अनुजाच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि उपचार करणाऱ्या डॉ. आदित्य रावण यांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच, पीडित मुलीच्या सुरक्षेसाठी तेथे उपस्थित असलेल्या सांगलीच्या सहायक पोलीस निरीक्षकांशी संवाद साधला.

या संतापजनक घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करत राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, कोल्हापूर रेंजचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक यांना सविस्तर निवेदन दिले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “केवळ चोरी केल्याच्या संशयावरून निष्पाप दोन मुलींना घरात उलटे टांगून मारहाण करणे हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. आरोपीला हत्येचा आणि बालकांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल याची खात्री करावी. तपास पारदर्शकपणे आणि विनाविलंब पूर्ण करून सबळ पुरावे सादर करावेत, जेणेकरून आरोपीला जामीन मिळणार नाही किंवा तांत्रिक कारणाने सुटका होणार नाही.” असे नमूद केले आहे.

तसेच निवेदनात डॉ. गोऱ्हे यांनी पुढीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत. गंभीर जखमी अनुजाला शासकीय खर्चाने सर्वोत्कृष्ट उपचार आणि पुनर्वसनासाठी विशेष तरतूद करावी. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी ‘सोशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट’ तयार करून पुनर्वसनात पुढाकार घ्यावा. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ग्रामीण भागात बाल संरक्षण समित्या सक्रिय करणे, पालकांचे मानसिक समुपदेशन आणि १०९८ बाल हेल्पलाइनचा जनप्रचार करावा. ग्रामीण गुन्हे प्रतिबंध आणि पीडित समुपदेशनासाठी रिक्त पोलीस पाटलांच्या पदांची त्वरित भरती करावी.

या प्रकरणात डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सुनिता मोरे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली व डॉ. गोऱ्हे यांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे अनुजाशी संवाद करून दिला. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी अनुजाला धीर दिला आणि तिच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. स्त्री आधार केंद्राच्या वतीने तिला कपडे आणि खाऊ पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रणव गुरव, जिल्हा प्रमुख शारदा गुरव आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande