
नाशिक, 28 मार्च, (हिं.स.)। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात असलेल्या सुरू कामांदरम्यान शुक्रवारी (दि. २७) दुपारी भीषण दुर्घटना घडली. दिंडोरी रोडवरील तारवाला नगर परिसरात ट्रकमधून लोखंडी पाइप उतरविताना चॅनल अचानक घसरल्याने जड पाइप थेट चालकाच्या अंगावर कोसळला. या धक्कादायक घटनेत २२ वर्षीय तरुण चालकाचा जागीच मृत्यू झाला.
या सर्व प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मनोज वैजनाथ पनिका (२२, रा. मध्य प्रदेश) असे मृत चालकाचे नाव असून, तो ट्रक (एम.एच. ४६ सी.यू. ८१८६) घेऊन पाइप उतरविण्याच्या कामासाठी आला होता. दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास तो ट्रकवर चढून
पाइप खाली उतरवत असताना अचानक चॅनल पट्टी घसरली आणि ट्रकमधील जड लोखंडी एमएस पाइप त्याच्या अंगावर कोसळले. क्षणार्धात तो पाइपखाली दबला गेला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सहकारी कामगारांनी धाव घेत मनोजला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत तो बेशुद्ध झाला होता. कंपनीचे व्यवस्थापक दशरथ डावरे यांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार केशव भोये पुढील तपास करत आहेत.
सिंहस्थ कामांच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर
ही घटना घडल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा दर्जा आणि सुरक्षितता यावरती मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून नाशिक शहरातील नागरिक सातत्याने स्वतःचा जीव मुठीमध्ये धरून प्रवास करत आहे. तर यावर सातत्याने नागरिकांकडून तक्रारी होत असूनही महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. वारंवार ऑनलाईन तक्रारी जात आहेत लोक तोंडी तक्रारी करत आहे लेखी तक्रारी करत आहे परंतु महापालिका कुंभमेळ्याच्या नावाखाली या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहे. ठेकेदार आपला मनमानी कारभार करत असून त्यामुळेच नाशिककरांचा जीव टांगणीला लागला आहे पण यावर महापालिकेला आणि कुंभमेळा प्राधिकरणाला काहीही घेणे नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV