
नाशिक, 28 मार्च (हिं.स.)।
: नाशिक शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर विविध विकासकामे सुरू असली, तरी ती उशिराने सुरू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. अवघ्या वर्षभरावर कुंभमेळा येऊन ठेपला असताना अनेक प्रकल्पांची गती मंद असल्याचे चित्र दिसत आहे.
पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर या कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका स्थानिक पातळीवर बसत असून, त्याचा परिणाम सिंहस्थाच्या कामांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सिंहस्थाच्या कामांचे भवितव्य
काय, असा प्रश्न साधू-महंतांसह नाशिककरांना पडला आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक येणार आहेत. या भाविकांसाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे संथगतीने सुरू असल्याची टीका होत आहे.
शहरात विविध विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खोदकाम सुरू असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विकासकामांच्या नावाखाली शहराचे खोदकाम करून ठेवले असल्याचे चित्र दिसून येत.आहे.
दरम्यान, आखाती देशांतील युद्धाचा परिणाम अधिक तीव्र झाला, तर सिंहस्थाच्या तयारीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण होणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV