
रत्नागिरी, 28 मार्च, (हिं. स.) : या आर्थिक वर्षात शासनाने अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट करण्याचा सक्तीचा कार्यक्रम राबविला होता. त्याला भारतीय डाक विभागाने मोलाची साथ दिली. जिल्ह्यातील विविध शाळांमधून एकूण ४८८ शिबिरे घेऊन त्यात दहा हजारहून अधिक मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट करण्यात आले.
वय वर्षे ५ ते १५ वर्षीय मुलांचे बुबुळ व हाताचे ठसे अद्ययावत करण्याची सुविधा देण्यात आली. ही सुविधा शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिली होती. शासनाच्या या धोरणाला पोस्ट ऑफिसने मोलाची साथ दिली व जिल्ह्यातील आधार केंद्रे सक्रिय करून जिल्ह्यातील विविध शाळांमधून एकूण ४८८ शिबिरे घेण्यात आली. ही योजना कार्यान्वयित करताना वीज नसणे, मुलांच्या परीक्षा, वार्षिक स्नेहसंमेलन या सगळ्यावर पोस्ट ऑफिस, अधिकारी व कर्मचारी मात करून अनेक वेळा उशिरापर्यंत सेवा दिली. काही वेळा शाळेमध्ये वीज नसल्याने पोस्ट ऑफिसने आपल्याच ऑफिसमध्ये वेगळा काऊंटर उघडून फक्त शालेय विद्यार्थ्यासाठी सेवा दिली.
पोस्ट ऑफिसने दिलेल्या सेवेबद्दल सर्व शाळांचे मुख्याध्यापक, जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक विभाग व पालक यांनी पोस्टाचे आभार मानले. डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी सांगितले की ही सेवा अजूनही सुरू असून राहिलेल्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी