नाशिक शहरात रविवारी श्रीराम व गरुड रथाची मिरवणूक
Procession of Shri Ram and Garuda chariot in the city today
नाशिक शहरात रविवारी श्रीराम व गरुड रथाची मिरवणूक


नाशिक, 28 मार्च (हिं.स.)।

श्रीराम आणि गरुड रथोत्सव चैत्र महिन्यातील कामदा एकादशीला काढण्यात येतो. हा रथोत्सव रविवारी सायंकाळी ५ वाजता काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून सुरू होईल. रथोत्सवासाठी दोन्ही रथ सज्ज करण्यात आले आहे.

मानकरी असलेल्या पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरात पूजा करून पालखीतून भोगमूर्ती श्रीरामरथात आणल्या जातात. या मूर्तीना रामकुंड येथे परंपरेनुसार अवभृत स्नान घालण्यात येणार आहे. तीन तासांच्या या पूजेनंतर

रथ परतीच्या मार्गाने निघून काळाराम मंदिरात येतील.काळाराम मंदिरात यंदाचे मानकरी वंशपरंपरागत पूजाधिकारी नरेंद्रबुवा पुजारी यांच्या हस्ते मूर्तीची पूजा करून त्या मूर्ती श्रीरामरथात मान्यवरांच्या हस्ते आरती करून स्थापित केल्या जातील. यावेळी रामरथ आणि गरुडरथ दोन्ही समातंर उभे केले जातील. आरतीनंतर गरुडरथ पुढे निघेल. या रथाच्या पुढे सनई चौघडा असेल. मस्तकावर छत्री धारण केलेले यंदाचे मानकरी परंपरेनुसार रथाकडे तोंड करून उलट्या दिशेने मार्गक्रमण करतील. गरुडरथाची जबाबदारी श्रीकाळाराम संस्थानची असून, हा रथ ओढण्याचा मान अहिल्याराम व्यायाम शाळेकडे आहे.

रामरथ ओढण्याचा मान रास्ते आखाडा तालीम संघ आणि पाथरवट समाज यांच्याकडे आहे. दोन्ही रथ काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून निघतील. नागचौक, चरणपादुका चौक, लक्ष्मण झुला पूल, जुना आडगाव नाका, गणेशवाडी, गौरी पटांगण, रामरथ गाडगे महाराज पुलाखालून म्हसोबा पटांगणावर थांबेल तर गरुडरथ गौरी पटांगणावरून रोकडोबामैदानाकडे जाऊन पिंपळपार, धुमाळ पॉइंट, मेनरोड, बोहरपट्टी, सरकारवाडा, सराफ बाजार, भांडी बाजार, कपूरथळा, म्हसोबा पटांगण, सांडव्याच्या देवीसमोरून गंगाघाट मार्गे व्यायामशाळा येथे जाईल.चांदवडकर गल्ली, अहिल्याराम व्यायामशाळा, रामकुंड, म्हसोबा पटांगणावर थांबलेला रामरथ गरुडरथाच्या मागे रामकुंडावर नेण्यात येईल. येथे अवभृत स्नान झाल्यानंतर परशराम पुरिया रोड, मालवीय चौक, शनिचौक, हनुमान चौक, काळाराम मंदिर पूर्व दरवाजा हा रथांचा परतीचा मार्ग असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande