

रायगड, २८ मार्च (हिं.स.) : तब्बल चार वर्षांनंतर रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर झाला आणि तोही ऐतिहासिक पद्धतीने. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी स्वतः १७५ कोटी ७५ लाख २२ हजार रुपयांचा मूळ आणि १० लाख ९९ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मांडत जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा सभागृहासमोर ठेवला.
अर्थसभापतीपदाचे वाटप न झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षांनीच अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ आली. अलिबाग येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, कृषी, दिव्यांग कल्याण आणि मागास घटकांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यावरही लक्ष केंद्रीत केले आहे.रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठीची तरतूद १० लाखांवरून १५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली असून शिवपुण्यतिथीसाठी ५ लाख रुपये दिले आहेत. पाणीपुरवठा योजनांसाठी ३० लाख आणि रायगड परिसरातील विविध कार्यक्रमांसाठी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महिला व बालविकास विभागासाठी १५ कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून सर्व अंगणवाड्यांना १००% वीजजोडणी आणि वायफाय सुविधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बालकांच्या गणवेशासाठी २ कोटी ५० लाख रुपये, महिला बचत गटांसाठी मधुमक्षिका पालन किटसाठी ३० लाख रुपये राखीव आहेत. संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भजनी मंडळांना साहित्य संचासाठी २ कोटी ४० लाख रुपये दिले जातील.
अर्थसंकल्पातील विशेष योजनांमध्ये आरोग्य केंद्रांना सोलर प्रणाली, शाळांमध्ये सीसीटीव्ही व सोलर सुविधा, शेतकऱ्यांसाठी अनुदानित कृषी अवजारे, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते, स्वच्छतेसाठी घंटागाडी, तसेच भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजली व अभिनंदन ठराव मांडण्याची परंपरा विसरल्याची बाब सदस्य गीता जाधव यांनी निदर्शनास आणून दिली, ज्यावर सभागृहात क्षणिक चर्चा रंगली.
एकूणच, दीर्घ प्रतीक्षेनंतर सादर झालेला हा अर्थसंकल्प विकासाभिमुख, सर्वसमावेशक आणि जिल्ह्याच्या विविध विभागांच्या योजनांसाठी ठोस पावलं उचलणारा असल्याचे दिसून आले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)