अलिबागमध्ये रिक्षाचालकाने परत केले ३८ हजारांसह पाकीट
रायगड, २८ मार्च (हिं.स.) : धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण अलिबागमध्ये समोर आले आहे. एका प्रामाणिक रिक्षाचालकाने सापडलेले पाकीट परत करून केवळ वस्तूच नव्हे, तर हरवलेला विश्वासही परत मिळवून
Restore lost faith... - Alibaug jailer returns 38,000 women to Delhi


रायगड, २८ मार्च (हिं.स.) : धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण अलिबागमध्ये समोर आले आहे. एका प्रामाणिक रिक्षाचालकाने सापडलेले पाकीट परत करून केवळ वस्तूच नव्हे, तर हरवलेला विश्वासही परत मिळवून दिला.

अलिबागमधील प्राजक्ता नाका रिक्षा स्टँडवरील आशीर्वाद यशवंत पाटील (रा. मुळे – अलिबाग) हे नेहमीप्रमाणे आपले काम करत होते. २७ मार्च रोजी नागांव येथे प्रवासी सोडून परत येत असताना रायवाडी–नागांव मार्गावर त्यांना एक पाकीट सापडले. उत्सुकतेपोटी त्यांनी पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे आणि ओळखपत्र आढळले.अशा प्रसंगी अनेकजण मोहाला बळी पडतात; मात्र पाटील यांनी प्रामाणिकतेचा मार्ग स्वीकारला. ओळखपत्राच्या आधारे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिटाच्या मालकाचा शोध सुरू केला. अखेर त्यांना यश मिळाले आणि हे पाकीट मुंबईतील सांताक्रूझ येथील शिरीष सदानंद सिनकर यांचे असल्याचे स्पष्ट झाले.

पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन २८ मार्च रोजी सिनकर यांची भेट घेतली आणि त्यांचे पाकीट परत केले. सुमारे ३८ हजार रुपये आणि सर्व कागदपत्रे सुरक्षित पाहून सिनकर दांपत्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. त्यांनी पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांचा सन्मान केला.

या साध्या पण मोलाच्या कृतीतून आशीर्वाद पाटील यांनी समाजाला मोठा संदेश दिला आहे — प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे आणि पैशांपेक्षा माणुसकी अधिक मौल्यवान आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून अलिबागकर त्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम करत आहेत.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande