
छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.)। शहरभर हापूस विक्रीची दुकाने सजली आहेत. त्याचवेळी झारखंडच्या विक्रेत्यांचे जाळे यंदाही लक्षणीय प्रमाणात पाहायला मिळत आहे. मात्र सध्या तरी हापूस भाव १४०० ते १६०० रुपये डझनपर्यंत सांगितला जात आहे. पुढच्या महिन्यात भाव कमी होऊ शकेल, अशीही आशा व्यक्त केली जात आहे.
शहर बाजारात अजूनही फारसे आंबे दाखल झालेले नाहीत. त्यातल्या त्यात लालबाग, बदाम, हापूस एवढेच आंबे बाजारात दिसून येत आहेत. पुन्हा लाल बाग असो की बदाम, किलोमागे दीडशे ते दोनशे रुपयांपेक्षा जास्त भाव सांगितला जात आहे. तर, काही ठिकाणी हाच भाव अडीचशेच्या घरात सांगितला जात आहे. त्यामुळे अजूनही आंबे विक्री फारशी सुरू झालेली नाही. एकीकडे अशी स्थिती असताना, दुसरीकडे हापूस शहरात दाखल झाला आहे व जागोजागी विक्रीचे स्टॉल सजले आहेत. याच स्टॉलवर १४०० ते
१६०० रुपये डझनचा भाव सांगितला जात आहे. सर्वसाधारणपणे देवगड व रत्नागिरी हापूसचा भाव सारखाच आहे, पण काही स्टॉलवर रत्नागिरीचा हापूस कमी प्रमाणात दिसून येत आहे. त्याचप्रमाणे झारखंडच्या विक्रेत्यांचे स्टॉलही जागोजागी पाहायला मिळत आहेत. मोजक्या दिवसांत हे सर्व स्टॉल सज्ज झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis