सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी डॉ. अजित मराठे
मुंबई, 28 मार्च (हिं.स.)। सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्योजक डॉ. अजित श्रीराम मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. 2009 सालापासून ते ट्रस्टचे विश्वस्त म्हणून क
Saturday Club Global Trust


मुंबई, 28 मार्च (हिं.स.)। सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्योजक डॉ. अजित श्रीराम मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. 2009 सालापासून ते ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कार्यरत असून संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना डॉ. अजित मराठे यांनी मराठी उद्योजकता अधिकाधिक बहरावी आणि मराठी उद्योजकांना नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, असे सांगितले. तसेच मावळते अध्यक्ष अशोक दुगाडे यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. भविष्यात सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना जोडण्याचे काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. अजित मराठे हे सिव्हिल इंजिनियर असून त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. “Brand Equity Management in Real Estate Industry in MMR Region” या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. ते पहिल्या पिढीतील उद्योजक असून 1995 साली त्यांनी आपल्या मित्र राजेंद्र सावंत यांच्या सोबत व्यवसायाची सुरुवात इंटिरियर कामापासून केली. त्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात प्रवेश करून परवडणारी घरे बांधण्यावर विशेष भर दिला.

व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे. विविध सामाजिक उपक्रम, उद्योजक मार्गदर्शन, व्याख्याने आणि लेखन यांच्या माध्यमातून ते उद्योजकता प्रसाराचे काम करत आहेत. महाराष्ट्रातील युवकांनी उद्योग-व्यवसायात पुढे यावे आणि मराठी समाज व्यावसायिक समाज म्हणून ओळखला जावा हा त्यांचा ध्यास आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande