
रत्नागिरी, 28 मार्च, (हिं. स.) : एस. आय. ग्रुप ऑफ इंडिया (नवी मुंबई) आणि सेवा सहयोग फाउंडेशन (मुंबई) यांच्या सहकार्यातून संगमेश्वर तालुक्यातील १० शाळांना क्रीडासाहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन कोसुंब येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. यावेळी आंगवली हायस्कूलचे शिक्षक शैलेश कदम, संगमेश्वर तालुका क्रीडा समन्वयक व सोनवडे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक अभिजित कदम आणि विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कोसुंब हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत राऊत यांनी उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकातून सेवा सहयोग फाउंडेशनची यशस्वी वाटचाल, तसेच महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी, शिक्षण व सहशैक्षणिक, आरोग्य, शेती, पर्यावरण, क्रीडा, कला, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात संस्था राबवत असलेले विविध कार्यक्रम व उपक्रम यासंबंधीची माहिती दिली. संस्थेच्या भविष्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनाची माहिती विशद केली.
फुणगूस हायस्कूलचे शिक्षक सुरेश रणदिवे व दाभोळे हायस्कूलचे शिक्षक मनोज कनावजे यांनी साहित्य शाळांना कसे उपयुक्त असून, त्याचा शाळांना कसा फायदा होणार आहे हे सांगितले.
आंगवली हायस्कूल, तुळसणी हायस्कूल, कोसुंब हायस्कूल, कळंबस्ते हायस्कूल, दाभोळे हायस्कूल, फुणगूस हायस्कूल, सोनवडे हायस्कूल, कोंडगाव हायस्कूल, ताम्हाणे हायस्कूल आणि मारळ येथील केंद्र शाळांना क्रीडासाहित्य देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी