
पुणे, 28 मार्च (हिं.स.)। राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, २१० पैकी १८३ साखर कारखाने बंद झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ९८.८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून सर्वाधिक २३.१ लाख टन उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. पुणे विभागात २२.१ लाख आणि सोलापूर विभागात १८.९ लाख टन साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.
दरम्यान, राज्यातील साखर उद्योगाचा यंदाचा गाळप हंगाम सरासरी फक्त ११० दिवस चालला असला, तरी साखर उद्योगापुढील आव्हाने कायम राहिली आहेत. राज्यात १ नोव्हेंबर रोजी ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली. त्यानुसार साखर आयुक्तालयाने २४ मार्चपर्यंतचे ऊस गाळप, साखर उत्पादन आणि साखर उतारा ही माहिती जाहीर केली.सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांत राज्यात ९८८.३८ लाख क्विंटल म्हणजेच ९८.८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी ८०३.६२ लाख क्विंटल म्हणजेच ८० लाख मेट्रिक टन साखरचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन वाढले असले, तरी सरासरीच्या तुलनेत ही वाढ कमी असल्याने साखर उद्योगासमोरील आर्थिक संकट कमी झालेले नाही.कोणताही कारखाना किमान १४० ते १५० दिवस चालला, तरच त्याचे अर्थकारण टिकते. यंदा हंगाम वाढला असला, तरी संपूर्ण साखर उद्योगासमोरील आव्हाने कायम आहेत. यंदा पाऊस कमी असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कमी पावसाचा परिणाम संपूर्ण साखर उद्योगावर होऊ शकतो. राज्यातील गाळप हंगाम पुढील १५ दिवसांत संपण्याची शक्यता असल्याची माहितीही साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु