
पुणे, 28 मार्च (हिं.स.)। शहरात उन्हाळा वाढल्याने आता पाण्याची मागणी देखील वाढण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील काही भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांची गरज भागवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अतिरिक्त टँकर दिले जात आहेत. ‘शहरातील काही भागांमध्ये महापालिकेच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो.हा पाणीपुरवठा करताना टँकरचालक तसेच टँकरमालकांनी नागरिकांकडून पैशांची मागणी करू नये. पाण्याच्या टँकरसाठी पैसे मागितल्यास नागरिकांनीदेखील त्यांना पैसे देऊ नयेत,’ असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी हे आवाहन केले आहे. ‘जे टँकरचालक तसेच टँकरमालक नागरिकांकडून पैसे घेतील त्यांना पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल,’ असा इशाराही जगताप यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु