
जळगाव, 28 मार्च (हिं.स.) : जिल्ह्यात मार्चच्या अखेरीस पुन्हा एकदा हवामान बदलण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला असून, यामुळे उन्हाच्या झळांमुळे त्रस्त झालेल्या जळगावकरांना उकाड्यापासून काही दिलासा मिळेल, मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो. ३० मार्च ते २ एप्रिल या काळात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून, ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.यादरम्यान, आधीच १८ आणि १९ मार्चला झालेल्या पावसामुळे सुमारे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी या नुकसानीतून सावरत असताना, नव्या पावसाच्या अंदाजामुळे चिंता अधिक वाढली आहे. पावसामुळे मका, दादर आणि अन्य उभ्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो, तर वादळी वारा सुटल्यास केळीच्या बागांना मोठा फटका बसण्याचीही शक्यता आहे.
दुसरीकडे, या पावसामुळे जिल्ह्यातील तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी सावटामुळे तापमानात घट झाली होती, मात्र या आठवड्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्णतेने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुढील आठवडाभर अवकाळी सावट राहिल्याने उकाडा कमी होऊ शकतो, तरी दमट हवामान नागरिकांसाठी अस्वस्थता निर्माण करू शकते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर