
अकोला, 29 मार्च (हिं.स.)। अकोला शहरातील गॅस पुरवठ्याच्या स्थितीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी रविंद्र यन्नावार यांच्यासह सर्व गॅस एजन्सी संचालक उपस्थित होते. यावेळी गॅस पुरवठ्याचे नियोजन, उपलब्धता आणि नागरिकांना वेळेवर सेवा देण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान आमदार साजिद खान पठाण यांनी गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत कडक निर्देश दिले. “नागरिकांना वेळेवर घरपोच गॅस उपलब्ध करून द्यावा. कोणत्याही परिस्थितीत काळाबाजारी सहन केली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, बैठकीत गॅस साठ्याबाबत वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. शासनाच्या अधिकाऱ्यांकडून एजन्सीकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला असताना, गॅस एजन्सी संचालकांनी तो फेटाळून लावला. “आमच्याकडे सांगितल्याप्रमाणे साठा उपलब्ध नाही. आकडेवारी चुकीची सादर केली जात आहे,” असा आरोप एजन्सी धारकांनी केला.
याच वेळी केंद्र व राज्य सरकारवरही आ. पठाण यांच्याकडून टीका करण्यात आली. “सरकार व प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत आहे,” असा आरोप उपस्थितांकडून करण्यात आला.
गॅस वितरणावेळी काही ठिकाणी नागरिकांशी गैरवर्तन झाल्याच्या तक्रारीवर आमदार पठाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “नागरिकांशी उद्धट वर्तन सहन केले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी एजन्सींना दिला.
दरम्यान, वाढती गर्दी व तणाव लक्षात घेता गॅस एजन्सी संचालकांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली. यावर तातडीने दखल घेत आमदार पठाण यांनी अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अकोला पश्चिम मतदारसंघातील सर्व गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, पोलीस प्रशासनानेही यास सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीमुळे गॅस पुरवठा व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासन-एजन्सी यांच्यातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला असून, येत्या काळात यावर काय तोडगा निघतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शनिवारी गॅस सिलिंडर घेण्याच्या रांगेत उभे असलेल्या माजी सरपंच यांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. अशा कुठल्याही घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, सोबतच या घटनेस जबाबदार असणाऱ्यांची चौकशी समिती नेमून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आ. पठाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे