
मुंबई, 30 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी आणि चर्चेची घडामोड घडली आहे. दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट अचानक झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, या भेटीमागील नेमकं कारण काय याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. अजितदादांसारख्या प्रभावशाली नेत्याचा अपघात होतो आणि तरीही सरकारकडून साधा एफआयआर नोंदवला जात नाही, हे संशयास्पद असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांची झालेली भेट अधिकच महत्त्वाची मानली जात आहे.
पार्थ पवार हे शिवतीर्थ निवासस्थानी जवळपास दीड तास उपस्थित होते. मात्र भेटीनंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेले. त्यामुळे या चर्चेला आणखी खतपाणी मिळाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही भेट केवळ शिष्टाचाराची नसून भविष्यातील काही राजकीय समीकरणांची नांदी असू शकते.
दरम्यान, २ एप्रिल रोजी राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून त्यातील एका जागेसाठी पार्थ पवार यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने या घटनेला अधिकच राजकीय वजन प्राप्त झाले आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार राजकारणात अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनीही या संपूर्ण प्रकरणावर थेट भाष्य करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती.
याआधी केंद्रातील मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याचा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीसारख्या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची भेट ही केवळ औपचारिक नसून त्यामागे काही राजकीय संकेत दडले असल्याची चर्चा रंगत आहे. पुढील काही दिवसांत या भेटीमागील खरे कारण स्पष्ट होण्याची शक्यता असून, महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे नवे समीकरण निर्माण होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule