हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून कोयत्याने हल्ला, दोघे गंभीर, दोन आरोपी अटकेत
लातूर, 30 मार्च (हिं.स.) शहरात क्षुल्लक कारणावरून हिंसाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड मिळावी म्हणून हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून दोन जणांनी टेम्पो अडवत चालकासह त्याच्या सहकाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल
कोयता हल्ला


लातूर, 30 मार्च (हिं.स.)

शहरात क्षुल्लक कारणावरून हिंसाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड मिळावी म्हणून हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून दोन जणांनी टेम्पो अडवत चालकासह त्याच्या सहकाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मळवटी रोडवरील महादेव मंदिर परिसरात घडली. या घटनेतील जखमी राम दत्तात्रय शिंदे (वय ५५, रा. किनगाव, ता. अहमदपूर; सध्या हरिभाऊ नगर, लातूर) हे आपल्या टेम्पोने घरी जात होते. रस्त्यातील वाहन बाजूला व्हावे म्हणून त्यांनी हॉर्न दिला. याच कारणावरून संतापलेल्या अतीश उर्फ दाद्या कांबळे आणि करण कांबळे (दोघेही रा. सिद्धार्थ सोसायटी, लातूर) यांनी टेम्पो अडवून प्रथम त्याची समोरील काच फोडली. यानंतर आरोपींनी कोयत्याने शिंदे यांच्या पायावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्यासोबत असलेले अंकुश किशनराव सूर्यवंशी यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राम शिंदे यांच्या फिर्यादीवरून अतीश उर्फ दाद्या कांबळे व करण कांबळे यांच्या विरोधात गुरनं. २०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ३५१(२) (३), ३५२, ३२४(४) व ३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पो-लीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडेकर तपास करत आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

-------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande