पालकमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा एकात्मिक पर्यटन सर्किट अहवालाचे विमोचन
चंद्रपूर, 29 मार्च (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन सर्किट अहवालाचे विमोचन पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनूरी नर
पालकमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा एकात्मिक पर्यटन सर्किट अहवालाचे विमोचन


चंद्रपूर, 29 मार्च (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन सर्किट अहवालाचे विमोचन पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनूरी नरेश, महास्ट्राईड टीमचे जिल्हा प्रमुख अभिलाष अलोणी, पर्यटन तज्ज्ञ तन्वी पाटील, डेटा सायंटिस्ट शुभम पंचभाई व इतर मान्यवर उपस्थित होते.

हा उपक्रम जिल्हाधिकारी गौडा यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. तन्वी पाटील आणि अभिलाष अलोणी यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटनाच्या संधी ओळखण्यासाठी आणि त्यांची रचना करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे. या अहवालाचे जिल्हा कृती आराखड्यामध्ये नियोजन करून येणाऱ्या वर्षांत चंद्रपूर एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण करण्यास उपयोगी पडेल.

सदर अहवाल तयार करण्यात उपसंचालक (कोअर) आनंद रेड्डी व उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला केंद्रस्थानी ठेवून, पर्यटकांना आणखी विविध पर्यटन अनुभवांचा आनंद घेता येईल, याचे नियोजन करण्यात आले आहे. हा अहवाल भविष्यातील गुंतवणूक, धोरणात्मक निर्णय आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मार्गदर्शन करेल, ज्यामुळे जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या आणि आर्थिक संधींना लक्षणीय चालना मिळेल व अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल.

अहवालातील प्रमुख निष्कर्ष : 1) वन्यजीव, पर्यावरणपूरक पर्यटन, सांस्कृतिक, वारसा आणि ग्रामीण पर्यटनासह विविध पर्यटन अनुभवांना चालना. 2) पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संतुलन सुनिश्चित करून शाश्वत आणि जबाबदार पर्यटन पद्धतींचा प्रसार. 3) निश्चित केलेल्या पर्यटन मार्गांवर पायाभूत सुविधा आणि शेवटच्या टप्प्यातील संपर्क व्यवस्थेची मजबुती. 4) सामुदायिक सहभाग आणि स्थानिक उपजीविका निर्मितीला प्रोत्साहन. 5) चंद्रपूरसाठी पर्यटन स्थळाचे ब्रँडिंग आणि गुंतवणुकीची क्षमता वाढवणे, हा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande