छ. संभाजीनगर - युवा महोत्सवाचे शुल्क २५ रुपयांनी वाढले
छत्रपती संभाजीनगर, 29 मार्च (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून युवा महोत्सवाचे शुल्क प्रतिविद्यार्थी १०० रुपयांवरून १२५ रुपये करावे, यापैकी ७५ रुपये शुल्क विद्यापीठाकडे जमा करावे व ५० रुपये शुल्क महाविद्यालयांना महोत्सवाकरिता ठ
छ. संभाजीनगर - युवा महोत्सवाचे शुल्क २५ रुपयांनी वाढले


छत्रपती संभाजीनगर, 29 मार्च (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून युवा महोत्सवाचे शुल्क प्रतिविद्यार्थी १०० रुपयांवरून १२५ रुपये करावे, यापैकी ७५ रुपये शुल्क विद्यापीठाकडे जमा करावे व ५० रुपये शुल्क महाविद्यालयांना महोत्सवाकरिता ठेवावे, असा निर्णय विद्यार्थी विकास सल्लागार समितीने घेतला. त्याला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. ही शुल्क वाढ २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात लागू करण्यात आली आहे.

युवा महोत्सवामध्ये लोककला महोत्सवातील कलाप्रकारांचे सादरीकरण जिल्हास्तरीय प्राथमिक फेरी म्हणून घेण्यात यावे. या लोककला महोत्सवात प्रत्येक कला प्रकारातून गुणानुक्रमे ५ पारितोषिके देण्यात यावी. या विजेत्यांचा लोककला महोत्सव केंद्रीय पद्धतीने विद्यापीठात जानेवारी २०२७ मध्ये नामविस्तार दिनापूर्वी घेण्यात यावा. तसेच जिल्हा युवा महोत्सवातील २८ कलाप्रकारातील विजेत्यांचा केंद्रीय युवा महोत्सव गतवर्षीप्रमाणे घेण्यात यावा, असा निर्णय झाला असून त्यासंदर्भात अकॅडमिक कॅलेंडरमध्येही नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा युवा महोत्सवामध्ये प्रत्येक महाविद्यालयाला किमान ५ कलाप्रकारांमध्ये (२ सामूहिक कलाप्रकार व ३ वैयक्तिक कलाप्रकार) सहभाग घेणे अनिवार्य करावे. तसेच प्रत्येक कलाप्रकारात किमान ५ संघांच्या प्रवेशिका असतील, तरच त्या कलाप्रकारांची जिल्हा युवा महोत्सवात स्पर्धा घेण्यात यावी. केंद्रीय युवा महोत्सवामध्ये २०२४ व २०२५ मध्ये सहभागी न झाल्याबद्दल दंड झालेल्या महाविद्यालयांची यादी प्र-कुलगुरू कार्यालयाकडे देण्यात यावी व पुढील कारवाई प्र-कुलगुरू यांनी करावी, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande