एनएफएससी नागपूरला रशियन प्रतिनिधींची भेट;अग्निशमन अभियांत्रिकी सहकार्याबाबत सामंजस्य करार लवकरच
नागपूर, 29 मार्च (हिं.स.)। अग्निशमन अभियांत्रिकी आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी), नागपूर येथे २३ ते २६ मार्च २०२६ दरम्यान रशियातील सायबेरियन फायर
एनएफएससी नागपूरला रशियन प्रतिनिधींची भेट;अग्निशमन अभियांत्रिकी सहकार्याबाबत सामंजस्य करार लवकरच


नागपूर, 29 मार्च (हिं.स.)। अग्निशमन अभियांत्रिकी आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी), नागपूर येथे २३ ते २६ मार्च २०२६ दरम्यान रशियातील सायबेरियन फायर अँड रेस्क्यू अकादमीच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाने भेट दिली. ही अकादमी रशियाच्या ईएमईआरसीओएम अंतर्गत कार्यरत असून, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत असलेल्या एनएफएससी प्रमाणेच अग्निशमन शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, बचावकार्य, संशोधन आणि क्षमता विकास या क्षेत्रात कार्यरत आहे.

अकादमीचे प्रमुख इव्हान सर्जेएव यांच्या नेतृत्वाखालील या प्रतिनिधी मंडळात अँड्रेई इयारोवॉय, तातियाना बोइको आणि कॉन्स्टँटिन सॅनिन यांचा समावेश होता. एनएफएससी येथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. प्रतिनिधींनी संस्थेच्या ड्रिल ग्राउंडवरील प्रभावी संचलनाचा अनुभव घेतला.

भेटीदरम्यान प्रतिनिधी मंडळाने एनएफएससी मधील अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन सुविधा आणि विस्तृत अग्निशमन व बचाव प्रशिक्षण पायाभूत सुविधा पाहिल्या. संस्थेच्या आधुनिक प्रशिक्षण पद्धती, सल्लागार सेवा क्षमता आणि लाईव्ह फायर ऑपरेशन्ससह प्रात्यक्षिकांचे त्यांनी कौतुक केले. एनएफएससीचे संचालक डॉ. ए. आर. सोनटक्के यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन व विकास, सल्लागार सेवा तसेच विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण या संभाव्य सहकार्याच्या बाबींवर चर्चा झाली. दोन्ही संस्थांनी लवकरच सामंजस्य करार (MoU) करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

तत्पूर्वी, ‘अग्नि –2026’ या एनएफएससीच्या वार्षिक तांत्रिक महोत्सवात सर्जेएव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. तसेच त्यांनी आयडीयाथॉन -2026 ’ दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे कौतुक केले आणि संशोधन व ज्ञान देवाणघेवाणीसाठी सहकार्याचे आवाहन केले.

विद्यार्थी व प्राध्यापकांना संबोधित करताना सर्जेएव यांनी एनएफएससीच्या प्रशिक्षणाच्या उच्च दर्जाचे व पायाभूत सुविधांचे कौतुक केले. या सुविधा जागतिक दर्जाच्या संस्थांशी स्पर्धा करू शकतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक सक्षम करण्यासाठी दोन्ही संस्थांमधील सहकार्य वाढविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande