एलडीएफ-यूडीएफने भ्रष्टाचार करत वर्षानुवर्षे सत्तेची देवाणघेवाण केली : पंतप्रधान मोदी
तिरुवनंतपुरम, 29 मार्च (हिं.स.)।एलडीएफ आणि यूडीएफ यांनी केरळची लूट करून परस्पर फायद्यांचे वाटप केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ते केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पलक्कड येथे भव्य जाहीर सभेला संबोधित करताना बोलत होते.
एलडीएफ-यूडीएफने भ्रष्टाचार करत वर्षानुवर्षे सत्तेची देवाणघेवाण केली: पंतप्रधान मोदी


तिरुवनंतपुरम, 29 मार्च (हिं.स.)।एलडीएफ आणि यूडीएफ यांनी केरळची लूट करून परस्पर फायद्यांचे वाटप केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ते केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पलक्कड येथे भव्य जाहीर सभेला संबोधित करताना बोलत होते. या प्रचार प्रसंगी पंतप्रधान पारंपरिक केरळ मुंडू (धोतर) परिधान केलेल्या स्वरूपात दिसले. सभास्थळी पोहोचताच त्यांचे उत्स्फूर्त आणि भव्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी केरळमधील प्रसिद्ध वाद्य ‘चेंडा’ (ढोल) मोठ्या उत्साहाने वाजवला.

सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, यावेळी केरळमध्ये त्यांना वेगळेच वातावरण दिसत आहे. केरळ यावेळी बदलाचा संदेश देत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनडीएची वाढती लोकप्रियता आणि भाजपवरील लोकांचा विश्वास आता स्पष्टपणे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित जनसमुदायाचा उत्साह पाहून त्यांनी म्हटले की, पलक्कडमधील हा माहोल आता एका चळवळीत परिवर्तित झाला आहे. केरळमधील युवक, महिला आणि शेतकरी आता भाजप आणि एनडीएवर पूर्ण विश्वास ठेवत असल्याचे त्यांनी नमूद केले. या बदलाचे श्रेय त्यांनी केरळच्या जनतेच्या आशीर्वादाला आणि भाजप कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमांना दिले. तसेच केरळमध्ये राजकीय हिंसाचारात प्राण गमावलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. केरळच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक करताना, ‘सुंदरतम’ का म्हटले जाते याची अनुभूती पलक्कडमध्ये आल्यावरच येते, असेही त्यांनी सांगितले.

विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, केरळ अनेक दशकांपासून स्वार्थी राजकारणाच्या दोन मुखवट्यांमध्ये अडकले आहे. त्यांनी एलडीएफ आणि यूडीएफला अनुक्रमे ‘भ्रष्ट’ आणि ‘महाभ्रष्ट’ असे संबोधले. या दोन्ही आघाड्यांची धोरणे केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी असून विकासाशी त्यांना काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप त्यांनी केला. दशकानुदशके या दोन्ही आघाड्यांनी केरळची लूट करून परस्पर फायद्यांचे वाटप केल्याचा आरोपही त्यांनी केला. काही वर्षे एक सरकार आणि नंतर दुसरे सरकार चालवण्याचा त्यांच्यात करार असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप सत्तेत आल्यास त्यांच्या गैरप्रकारांचा पर्दाफाश होईल, या भीतीमुळे या पक्षांना भाजपची भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. बिहार, तमिळनाडू आणि झारखंडसारख्या राज्यांत हे पक्ष एकत्र आघाडीत असतात, मात्र केरळमध्ये एकमेकांवर टीका करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

केरळमध्ये भाजप आणि एनडीए सरकार स्थापनेसाठी मैदानात उतरले असल्याचे सांगताना त्यांनी म्हटले की, केरळच्या जनतेच्या आशीर्वादाने येथे एनडीएचे सरकार स्थापन होईल. लोकांच्या स्वप्नांची पूर्तता करणे हे एनडीएचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्रात सत्तेत असतानाही केरळच्या विकासासाठी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात भाजप सरकार आल्यास सर्व घोटाळ्यांची चौकशी करून जनतेला न्याय दिला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. केरळमध्ये स्थापन होणारे एनडीए सरकार राज्याचा वेगवान विकास करेल, ही ‘मोदींची हमी’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सभेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “सध्या पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. या युद्धाचा भारतावर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. युद्ध सुरू झाल्यापासून मी संबंधित देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सतत संपर्कात आहे. युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेला सर्व देश प्राधान्य देत आहेत. या संवेदनशील विषयावर काँग्रेस ज्या प्रकारे राजकारण करत आहे, ते जनतेने लक्षात ठेवावे. काँग्रेसच्या विधानांमुळे खाडी देशांमध्ये राहणाऱ्या सुमारे १ कोटी भारतीयांचे जीवन धोक्यात येऊ शकते आणि त्यातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे त्यांनी म्हटले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande