लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून रोकड व दागिने लंपास
रायगड, 03 मार्च (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नासाठी कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून रोकड व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीसांकडून
Cash and jewellery stolen from the house of a family who had gone out of town for a wedding


रायगड, 03 मार्च (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नासाठी कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून रोकड व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 4.30 वाजल्यापासून ते मार्च 2026 रोजी सायं. 4.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत मौजे चिंचवली शेकीन येथील कल्पक बिल्डिंग क्रमांक 1, रूम क्रमांक 02, खोपोली येथे ही घटना घडली. संबंधित महिला फिर्यादी व त्यांचे पती हे मावसभाऊच्या मुलाच्या लग्नासाठी गुलबर्गा (कर्नाटक) येथे गेले होते.

याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा व लोखंडी कपाटातील तिजोरीचे कुलूप तोडून तिजोरीतील सुमारे 44,600 रुपये रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लबाडीच्या हेतूने व आर्थिक फायद्यासाठी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 75/2026, भा.न्या.सं. कलम 331(3), 331(4), 305 (A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा निकाळजे करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande