
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी
अमरावती, 30 मार्च (हिं.स.) । राज्यातील शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी राबविल्या जाणार्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या पुढील टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील आठ शाळांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २७ मार्च २०२६ रोजी यासंदर्भात शासननिर्णय जाहीर केला. राज्यातील एकूण ४०५ शाळांना या टप्प्यात आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, चांदूररेल्वे, अमरावती तसेच मनपा अमरावती या तालुक्यांतील शाळांचा समावेश आहे.या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देताना पायाभूत सुविधा, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, डिजिटल शिक्षण साधने आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र ‘पिंक रूम’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात एक शाळा क्रीडा प्रबोधिनी म्हणून विकसित करण्याचे धोरण देखील शासनाने स्वीकारले असून, अमरावतीत क्रीडा सुविधांवर भर दिला जाणार आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण व दुर्लक्षित भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून, शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत.राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले की, “योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकतील आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सुविधा मिळतील. यामुळे पालकांचा शाळांकडे ओढ वाढेल आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.”
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी