
अमरावती, 30 मार्च (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या शास्ती/दंड माफी योजनेचा अंतिम टप्पा आला असून नागरिकांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत कर न भरल्यास कठोर वसुली कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या विशेष योजनेंतर्गत थकबाकीसह मालमत्ता कराची एकरकमी भरपाई करणाऱ्यांना शास्तीच्या रकमेवर २५ टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन माध्यमातून कर भरल्यास अतिरिक्त तीन टक्के सवलत मिळणार आहे. नागरिकांना घरबसल्या डिजिटल पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करातून शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य सुविधा व इतर विकासकामे राबविली जातात. त्यामुळे कर वसुली वाढविण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदार मालमत्तांवर जप्ती, सीलिंग, दंडात्मक कारवाई तसेच कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता त्वरित कर भरणा करावा. शहर विकासासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असून सवलतीच्या कालावधीत सर्वांनी मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्तांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी