“लोकप्रतिनिधी म्हणून मदत करणे हे कर्तव्य”- मंगलप्रसाद लोढा
जैन समाजासाठी गॅस सिलेंडर देण्याचा विवाद मुंबई, 30 मार्च (हिं.स.) : राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या उत्सवासाठी मलबार हिल परिसरातील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी पाच एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची विनंती केल्यामुळे निर्मा
मंगलप्रभात लोढा


जैन समाजासाठी गॅस सिलेंडर देण्याचा विवाद

मुंबई, 30 मार्च (हिं.स.) : राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या उत्सवासाठी मलबार हिल परिसरातील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी पाच एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची विनंती केल्यामुळे निर्माण झालेला वाद आता वाढला आहे. विरोधकांनी लोढा यांच्यावर एका विशिष्ट धर्माला प्राधान्य दिल्याचा आरोप केला होता.

या आरोपांना उत्तर देताना लोढा यांनी एक व्हिडिओ शेअर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यांनी सांगितले की, सध्या हिंदू सण किंवा धार्मिक कार्यक्रमांबाबत टीका करणे एक प्रकारची “फॅशन” बनली आहे आणि त्यांच्यावर झालेली टीका देखील त्याच मानसिकतेचा भाग आहे. त्यांच्या मतदारसंघात रामनवमी, साई भंडारा तसेच जैन समाजाचे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडतात. या कार्यक्रमांसाठी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे अतिरिक्त प्रयत्न करणे आवश्यक ठरते, असे त्यांनी नमूद केले.

लोढा म्हणाले की , “माझ्या कार्यालयात साई भंडाऱ्यासाठी आणि जैन समाजाच्या कार्यक्रमांसाठी अनेक लोक मदतीसाठी आले होते. लोकप्रतिनिधी म्हणून मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. मी प्रयत्न केला तर त्यात काय चूक आहे?” त्यांनी पुढे 2 एप्रिलला हनुमान जयंती आणि 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याचे सांगितले आणि या दिवशीही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम पार पडणार असल्यामुळे आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे अधोरेखित केले.

लोढा यांनी स्पष्ट केले की, कोणाला त्यांच्या कृतीत गैर वाटत असेल किंवा वाद निर्माण करायचा असेल, तो करू शकतो; परंतु ते आपल्या जबाबदारीपासून पळ काढणार नाहीत.

राज्यात गॅसचा तुटवडा नाही आणि सरकार व्यवस्थित काम करत आहे. विशेष प्रसंगी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना पत्र लिहून नागरिकांना होणाऱ्या संभाव्य त्रासाची दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच, एका विशिष्ट समाजासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत, गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी कठोर भूमिका घेण्याचा इशारा मनसेकडून दिला गेला आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande