
अकोला, 30 मार्च (हिं.स.) : अकोला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून भाजीपाला, फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटनाही घडल्या असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी वीज वितरण कंपनी, महसूल विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका व महानगरपालिकांना त्वरित सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अचानक झालेल्या पावसामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनीने विशेष पथके तयार करून दुरुस्तीची कामे त्वरीत हाती घ्यावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी व ग्रामस्थांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना उन्हाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे