शेतातील किरकोळ वादाचे हिंसक वळण; तिघांना कारावास, नुकसान भरपाईचाही आदेश
लातूर, 30 मार्च (हिं.स.)। शेतातील गाय बांधण्याच्या साध्या कारणावरून निर्माण झालेला बाद पुढे गंभीर स्वरूप धारण करत मारहाणीपर्यंत पोहोचल्याच्या प्रकरणात औसा येथील फौजदारी न्यायालयाने महत्त्व-पूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणातील तिघा आरोपींना प्रत्ये
मारहाण


लातूर, 30 मार्च (हिं.स.)।

शेतातील गाय बांधण्याच्या साध्या कारणावरून निर्माण झालेला बाद पुढे गंभीर स्वरूप धारण करत मारहाणीपर्यंत पोहोचल्याच्या प्रकरणात औसा येथील फौजदारी न्यायालयाने महत्त्व-पूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणातील तिघा आरोपींना प्रत्येकी एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून, जखमी फिर्यादीला उपच-रारासाठी दोन हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील किरकोळ कारणांवरून वाढणाऱ्या वादांना कायद्याचा कडक इशारा मिळाल्याचे दिसून येत आहे. सदर घटना सन २०२० मध्ये घडली होती. शेतातील जागेवर गाय बांधण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला. मात्र, हा वाद काही वेळातच चिघळत गेला आणि त्याचे रूपांतर थेट मारहाण, शिवीगाळ व धमकावण्यात झाले. या घटनेत फिर्यादी, त्यांचा मुलगा तसेच सुनेला आरोपींकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात भादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ व ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब बलभीम ढवन, तेजस उर्फ अण्णासाहेब ढवन आणि श्रीहरी बळवंत जावळे (रा. ककासपूर, जि. उस्मानाबाद) यांच्याविरुद्ध सखोल तपास करण्यात आला.

तपास अधिकारी पोलीस अंमलदार कमल शेख यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांचे जबाब, तसेच वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे ठोस पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती ए. एन. निळेकर व रेवशेटे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत आरोपींविरुद्ध पुराने ठोस असल्याचे मांडले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार धनंजय जाधव यांनी सुनावणीदरम्यान समन्वय राखत महत्त्वाची भूमिका बजावली. भादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तपास प्रक्रिया पार पडली. न्यायालयाने फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी, तसेच सादर करण्यात आलेले पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपींना दोषी ठरवले. न्यायाधीश पी. पी. आवटे यांनी तिघांनाही एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावताना, जखमी व्यक्तीस आर्थिक नुकसानभरपाई देण्याचेही आदेश दिले.

या निकालामुळे ग्रामीण भागात किरकोळ कारणांवरून उद्भवणाऱ्या वादांना हिंसक वळण देणाऱ्यांवर कायद्याचा धाक बसणार असून, वाद संवादाने सोडवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. समाजात शांतता, संयम आणि परस्पर समन्वय राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश या प्रकरणातून स्पष्टपणे समोर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande