
रायगड, 30 मार्च (हिं.स.)।रायगड जिल्ह्यातील चिंचोटी वनव्यवस्थापन समितीच्या सुमारे 29 लाख रुपयांच्या कथित अपहार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना हजर राहण्याची नोटीस बजावत पोलिसांनी सादर केलेला ‘अ’ समरी अहवाल रद्द केला आहे.
वृक्ष लागवडीच्या नावाखाली निधीचा अपहार झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. समितीचे अध्यक्ष प्रकाश भांजी, सचिव संजय पाटील तसेच इतर 16 सदस्यांविरुद्ध न्यायालयाने कारवाईची दिशा ठरवली असून त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात अॅड. राकेश नारायण पाटील यांनी पुराव्यांसह रेवदंडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांकडून कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रथमदर्शनी आरोपांमध्ये तथ्य असल्याचे मान्य करत संबंधितांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तरीही पोलिसांनी पुरावे अपुरे असल्याचे सांगत प्रकरण ‘अ’ समरीमध्ये वर्ग करून बंद केले. या निर्णयाला आव्हान देताच न्यायालयाने ‘अ’ समरी रद्द करून प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.
तपासादरम्यान अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. वृक्ष लागवडीच्या खर्चात सुमारे 12 लाख रुपयांची तफावत आढळली आहे. काही अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावावर मजुरी दाखवण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. याशिवाय, न झालेल्या सभा व प्रशिक्षणावर खर्च दाखवण्यात आला असून बापळे गावातील डोंगरावर प्रत्यक्ष लागवड न करता सुमारे 10 लाख रुपयांचा खर्च दाखविल्याचा आरोप आहे. खासगी जमिनीवर लागवड केल्याचे दाखवूनही निधीचा अपहार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या घडामोडींमुळे वनव्यवस्थापन समितीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा घोटाळा जिल्ह्यासह राज्यभर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘अ’ समरी अहवाल रद्द केल्याने आता या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असा विश्वास तक्रारदार अॅड. राकेश नारायण पाटील यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)