अमरावतीत होणार राज्यातील सर्वात मोठा पुस्तक महोत्सव
अमरावती, 30 मार्च (हिं.स.) : राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवांना मिळणाऱ्या प्रतिसादानंतर, राज्यातील सर्वात मोठा पुस्तक महोत्सव आगामी ऑक्टोबर महिन्यात अमरावती येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा
राज्यातील सर्वात मोठा पुस्तक महोत्सव अमरावतीत होणार:ऑक्टोबरमध्ये आयोजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा


अमरावती, 30 मार्च (हिं.स.) : राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवांना मिळणाऱ्या प्रतिसादानंतर, राज्यातील सर्वात मोठा पुस्तक महोत्सव आगामी ऑक्टोबर महिन्यात अमरावती येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली.

येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि जिल्हास्तरीय पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभाताई खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी आणि सहायक संचालक राजेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, मानवी जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तकांमुळे समाज प्रगल्भ होतो आणि अनेक क्रांती घडतात. त्यामुळे जिल्ह्यात वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी 'गाव तिथे ग्रंथालय' हा उपक्रम राबविण्यात येईल. यासाठी गावातील विनावापर इमारतींची दुरुस्ती करून तेथे वाचनालये सुरू केली जातील, ज्यामुळे प्रत्येक गावात वाचनाची चळवळ उभी राहण्यास मदत होईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी यांनी केले, तर सहायक संचालक राजेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.दरम्यान, नव्याने तयार झालेल्या या इमारतीमध्ये वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करून येथे डिजिटल लायब्ररीही निर्माण करण्यात येणार आहे. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या डिजिटल लायब्ररीचा उपयोग होईल. यासोबतच, स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आणि मॉड्यूलर अभ्यासिका उभारण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande